खबरदारी हीच सुरक्षितता!

खबरदारी हीच सुरक्षितता!

पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असल्याने घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे. वीज दिसत नाही पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्कता व योग्य खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे.

पाणी हे विजेचे वाहक असल्याने विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्यावी. विशेषत: मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व महावितरणच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. ही उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर ठेवावीत. जेणेकरुन त्यात पावसाचे पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणे ओलसर झाले असल्यास ते त्वरित बंद करून प्लगसह बाजूला करावे. तसेच पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये तसेच ही तार विजेच्या खांबाला किंवा इतर वीज यंत्रणेला बांधू नये.

मेनस्विचमध्ये फ्यूज वायरच असावी

घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे. ही फ्यूज तार वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार फ्यूजसाठी वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.

विद्युत सुरक्षेसाठी उपाययोजनाही महत्वाच्या!

  1. वीजमीटरपासून घरामध्ये केलेल्या जुनाट वायरिंगची स्थिती योग्य असल्याची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी. वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व विद्युत उपकरणांचे अर्थींग योग्य असल्याची खबरदारी घ्यावी. मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज इत्यादी उपकरणांसाठी थ्रीपिन सॉकेटचाच वापर करावा. कारण थ्रीपिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.
  2. घर, दुकान, सोसायट्या व इतर वास्तुमधील अंतर्गत वायरिंग, विविध उपकरणे किंवा लोखंडी साहित्यामधील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून विद्युत अपघात होतात. यासाठी प्रामुख्याने वायरिंगमधील करंट लिकेज तसेच योग्य क्षमतेचे सर्कीट ब्रेकर किंवा अर्थिंग नसणे कारणीभूत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून घर किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर लावल्यास विद्युत अपघात टाळता येतात.
  3. घरगुती किंवा इतर आस्थापनांमधील अंतर्गत वीजयंत्रणेत बिघाड झाल्यास आणि वीजपुरवठा खंडित न होता सुरु राहिल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. वीजपुरवठा तात्काळ खंडित होणे आवश्यक आहे. त्यामुळे घर, सोसायटी किंवा इतर वास्तुंमध्ये सर्कीट ब्रेकर जसे की अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर (इएलसीबी), रेसीड्यूअल करंट सर्कीट ब्रेकर (आरसीसीबी) मिनिएच्यूअर सर्कीट ब्रेकर (एमसीबी) लावणे अत्यावश्यक आहे. अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणामधील दोषामुळे सर्किट ब्रेकर म्हणजे विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्वाचे सुरक्षा कवच आहे.

सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहा

अतिवृष्टीमुळे, वादळाने तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. सावध राहावे. वीजप्रवाह सुरु असण्याची शक्यता असल्याने विद्युत अपघात होण्याची शक्यता असते.

विद्युत सुरक्षेसाठी काय करू नये!

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. कपडे वाळविण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळावा. अनावधानाने ही तार वीजप्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर अपघात होऊ शकतो. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असावेत. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये.

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे

वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनीमातीचे असतात. वीजप्रवाह वितरण यंत्रणेच्या लोखंडी खांबात उतरू नये, यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनीमातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डीपी आदी वीजयंत्रणेजवळील जागेत घरातील सुका व खाद्यपदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदाथार्मुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात आणि वीजयंत्रणेच्या संपर्कात आल्यावर शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. प्राण्याचा नाहक जीव जाण्याचेही प्रकार घडले आहेत.




Comments

Popular posts from this blog

Recognizing the risks associated with incorrect earthing of diesel generator.

What are the disadvantages of poor power factor?